Thursday, August 28, 2014

रेल्वे रुळांजवळचे प्रदूषण रोखा

रेल्वे प्रवाशांच्या विष्ठेमुळे रेल्वे रुळांच्या बाजूला मोठे प्रदूषण होते. या प्रदूषणाची गंभीर दखल राष्ट्रीय हरित लवादाने घेतली आहे.
railway trackनवी दिल्ली- रेल्वेतून प्रवास करताना प्रवासी खाण्याचे पदार्थ, खाद्यपदार्थाची वेष्टने, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गाडीतून टाकून देतात. तसेच रेल्वे प्रवाशांच्या विष्ठेमुळे रेल्वे रुळांच्या बाजूला मोठे प्रदूषण होते. या प्रदूषणाची गंभीर दखल राष्ट्रीय हरित लवादाने घेतली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी रेल्वेने कठोर पावले उचलावीत, असे आदेश लवादाने रेल्वेला दिली आहेत.
लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांच्या पीठाने रेल्वे खाते, रेल्वे बोर्ड, पर्यावरण व वन खात्याला दिले आहेत. याबाबत येत्या दोन आठवडयात आपली बाजू मांडावी, असे पीठाने सांगितले.
रेल्वे रुळांच्या बाजूला होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नेमकी काय पावले उचलली याचे नेमके धोरण सादर करावे. रेल्वे रुळाच्या बाजूला प्रवाशांकडून टाकण्यात येणा-या खाद्यपदार्थाच्या पॅकिंगमुळे मोठया प्रमाणावर प्रदूषण होत आहे. तसेच प्रवाशांची विष्ठा रेल्वे रुळावर पडल्याने त्यातून अनेक रोगांचा फैलाव होऊ शकतो. त्यातून मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होते. याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. या प्रकरणी १५ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे, असे लवादाने स्पष्ट केले.
सलोनी सिंग आणि अरुष पठाणिया या वकिलांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. देशातील सर्वच रेल्वे फलाटांवरून प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदी घालावी. तसेच रेल्वे रुळांच्या बाजूला उघडयावर संडास करायला नागरिकांना बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेत केली. प्लॅस्टिक बाटल्या आणि मानवी विष्ठेमुळे पर्यावरण साखळीवर मोठा परिणाम होत असल्याचे याचिकदारांनी सांगितले. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी पर्यावरण कार्यकर्ते, तज्ज्ञ आणि वकिलांची समिती नेमावी, अशी मागणी करण्यात आली.