Thursday, August 28, 2014

माळीणच्या पुनर्वसनासाठी सात कोटी

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसनासाठी सात कोटी रुपये देण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली.
landslide in Malinमुंबई- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसनासाठी सात कोटी रुपये देण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली.
माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोठी प्राणहानी झाली होती. यासंदर्भात पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ३० कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये खर्च करुन तात्पुरते शेडेचे बांधकाम, ७२ कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये खर्चून पक्की घरकुले, प्रति एकर चार लाख रुपये दराने आठ एकर जमिनीची खरेदी, तसेच नागरी सुविधांसाठी पाच कोटी रुपये याप्रमाणे खर्च केला जाणार आहे.
याशिवाय गावामध्ये स्मृती भवन, स्मृती स्तंभ, कुंपणाची भिंत व समाज मंदिर यासाठी लागणारा एक कोटींचा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात येणार आहे. पुनर्वसनाच्या कामासाठी पुण्याच्या जिल्हाधिका-यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यात उदभवू शकणा-या आकस्मिक बाबींचा विचार करता खर्चाची कमाल मर्यादा १० कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही सर्व कामे एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यात येतील.