Saturday, November 15, 2014

६ महिन्यांत डेंग्यूचे ७९ रुग्ण



नागपूर, मागील काही दिवसांपासून उपराजधानीप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील डेंग्यूचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या ६ महिन्यांत डेंग्यूचे ७९ संशयित रुग्ण आढळून आले असून, यातील दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात विचारणा केली होती. यातील माहितीनुसार १ एप्रिल २०१४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत डेंग्यूचे २१४ संशयित रुग्ण आढळून आले व ९ जणांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०१० पासून साडेचार वर्षांत ३८७ संशयित रुग्णांपैकी १५ जणांचा मृत्यू झाल्याची बाब या माहितीच्या अधिकारात नमूद करण्यात आली आहे.
डेंग्यूप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात मलेरियाच्या रुग्णांची माहिती मागविण्यात आली होती. १ एप्रिल २०१४ ते ३० सप्टेंबर या ६ महिन्यांच्या कालावधीत मलेरियाचे १५६ संशयित रुग्ण आढळून आले, मागील वर्षी हेच प्रमाण २४३ इतके होते. एप्रिल २०१० पासून एकूण संशयित रुग्णांचा आकडा २०८२ इतका आहे. परंतु दरवर्षी संशयित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.