रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींसाठी फेसबुकवर पेज
रेल्वेत महिलांवर होणारे हल्ले आणि चोरीच्या वाढत्या घटनांची तक्रार नोंदवण्याकरता तक्रारदाराला पोलिस ठाण्यात जावे लागते. त्यामुळे पीडित व्यक्ती तक्रार करायला जात नाही.
मुंबई - रेल्वेत महिलांवर होणारे हल्ले आणि चोरीच्या वाढत्या घटनांची तक्रार नोंदवण्याकरता तक्रारदाराला पोलिस ठाण्यात जावे लागते. त्यामुळे पीडित व्यक्ती तक्रार करायला जात नाही. त्यामुळे रेल्वेतील गुन्हेगारी वाढत आहे.
प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन नव्याने रुजू झालेले रेल्वे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी फेसबुकवर ‘पेज’ तयार केले आहे. या माध्यमातून प्रवाशांना थेट तक्रार नोंदवता येणार आहे.
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकलमध्ये महिलांची छेडछाड, चोरीच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांना रोखण्याकरता आता रेल्वे पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पीडित प्रवाशाला तक्रार देण्याकरता संबधित रेल्वे पोलिस ठाण्यात जावे लागायचे. पण, आता प्रवाशांना थेट फेसबुकच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे.
एखाद्या घटनेची छायाचित्रे किंवा माहिती या पेजवर अपलोड करता येईल. एवढेच नव्हे, तर रेल्वे अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांबाबतही या वेबपेजवर माहिती उपलब्ध असणार असल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले. महिला प्रवाशांच्या सुरक्षेकरता मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर ‘निर्भया पथक’ सुरू करण्यात आले आहे.
या पथकातील महिलांना खास प्रशिक्षण देण्यात आले असून, भविष्यात त्यांना तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रवासी सुरक्षा समितीही तयार करण्यात आली आहे. या समितीची महिन्याला बैठक होणार असून, त्यात महिलांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्यात येणार आहे.
रेल्वे फलाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाईल. तसेच फलाटांवर महिला प्रवाशांकरता ‘मदत केंद्र’ सुरू केले जाणार आहेत. रेल्वे फलाटांवर तक्रार पेटय़ाही बसवण्याचा विचार असल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले. रेल्वे स्थानकांवर चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.